काही अनुभव शब्दांत मांडणं केवळ अवघडच नसतं तर अशक्य असतं… जसं टवटवीत हिरवळीवरून चालतांना अनवाणी तळपायांना होणारा स्पर्श, गालावरून फिरणारे थरथरणारे आजीचे वयस्कर सुरकुतलेले हात, टक्कं उन्हात अचानक भिजवून गेलेली पावसाची सर, आवडत्या व्यक्तीला whatsapp वर पाठवलेल्या मेसेजने दोन जुळ्या निळ्या खुणा दाखवल्यानंतर त्याच्या नजरेचा स्पर्श झालेला आपलाच मेसेज पुन्हा पुन्हा वाचतांना होणारा आनंद, अस्वस्थपणात अनपेक्षीतपणे दुरून अत्यंत आवडत्या गाण्याच्या ओळी कानावर पडणं, आजारपणात आईच्या कुशीत शिरून घेतलेली झोप, एखाद्या छोट्याश्या यशानंतर सुद्धा कौतुकभरली डबडबलेल्या गच्च डोळ्यांची बाबांची नजर, धाकट्या भावंडानं हक्कानं केलेला हट्ट पुरवतांना येणारं आईपण, जन्माला घातल्यानंतर प्रथमच कुशीत घेतलेल्या आपल्या बाळाचा स्पर्श, त्याचं रेशीम जावळ, इवल्याशा बोटांची घट्ट मुठ सोडवतानाची नाजुक धडपड, पहिल्यांदा जमलेली पुरणपोळी, सायकल शिकतांना पहिल्यांदाच पडून खरचटलेला गुडघा, पहिल्यांदा सासरी निघतांना नजरेने घेतलेला निरोप, गॅलरीतल्या मोगर्याला आलेल्या पहिल्या फुलाचा हावरटासारखा घेतलेला ऊरभरून वास, चाफ्याचा ढीग दूरवर दिसत असतानांही अनुभवलेला सुवास, अंबाबाईच्या गाभाऱ्यात दरवळणारा धूप, अक्कलकोटच्या अन्नछत्रात महाप्रसादा आधीच्या आरतीचा ठेका, आत्याबाईंनी दिवेलागणीला लावलेल्या केशर केवड्याच्या उदबत्तीचा घमघमाट, वयांत आलेल्या ताडमाड लेकराचा खांद्यावरचा आधाराचा हात, नटवलेल्या नवरीचे स्वतःकडे पहातांना आनंदाने चमकलेले डोळे, इ.इ.इ. किती आणि काय….अनंतकाळ न संपणारी यादी !! या सगळ्या गोष्टी घटना म्हणून सांगणं शक्य आहे पण अनुभवताना हृदयापासून मेंदूपर्यंत गेलेली एक विशिष्ट आनंदाची लहर शब्दांत नाही मांडता यायची कधीच, कुणालाच….!!
Leave a Reply