
पावसाळा संपता संपता सप्टेंबर उजाडला आणि थंडीच्या दिवसांचे वेध लागले. गरम कपडे बाहेर काढून त्यांना स्वच्छ धुऊन वाळवून थंडीसाठी तयार असणं हे तसं दरवर्षीचच… आम्ही तिघीजणी अशा लहानच होतो. माझी आणि संध्याची शाळा सकाळची आणि राखी नुकतीच पहिलीत वगैरे असेल. आता सकाळची शाळा म्हटल्यावर थंडी गारठ्यात स्वेटर तर हवाच मी जेमतेम दहा अकरा वर्षाची आणि मग त्या खालोखाल दोन दोन वर्षांनी लहान संध्या आणि राखी… त्यामुळे सतत सर्दी पडस आणि आमचं अधून मधून धडपडणं. मग काय, दवाखाना, औषध, डोक्याला बांधायचे रुमाल, स्वेटर्स हे सगळं सतत तयार असायचं. यावर्षी मात्र तिघींनाही स्वेटर घेण्याची वेळ येणार होती. आईचा स्वेटरही तसा बदलण्यावर आला होता. हो त्याकाळी गरजेशिवाय खरेदी हे माजर्डेपणाचे लक्षण होतं. मग ठरलं की संध्याकाळी सगळ्यांसाठी नवे स्वेटर तयार करायला द्यायचे. हो. ही गोष्ट जवळपास 40 वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळी रेडीमेड स्वेटर्स, ओव्हरकोट इतके छान मिळत नसत आणि लक्ष्मी रोडच्या प्रकाश डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये आपल्याला हवी तशी, हव्या त्या रंगाची लोकर निवडून, हव्या त्या डिझाइनचे आणि आपल्या मापाचे असे कस्टमाईज्ड स्वेटर बनवून मिळत असत. सकाळपासून आम्हा बहिणींमध्ये तुला कोणता रंग मला कोणता रंग यावरून धमाल सुरू होती. संध्याकाळ होण्याची आम्ही वाट बघत होतो, अखेरीस संध्याकाळी आप्पासाहेब कारखान्यातून लवकर आले आणि आमच्यासहित लवाजमा थेट प्रकाश डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये…. आजच्यासारखं तेव्हा एका क्लिकमध्ये घरपोच कपडे मिळणं ही गोष्ट कल्पनेच्या बाहेरची होती. कपडे घ्यायचे म्हटलं तरी तो एक सोहळा असायचा. विशेष म्हणजे आई वडील दोघेही खरेदीसाठी आमच्या सोबत असायचे. कितीतरी दिवस ठरवून मग एकदा लक्ष्मीरोडला गेलो की कपडे घेण्यात देखील भारी मौज असायची आणि विकत घेतलेल्या कपड्यांचं अप्रूप देखील असायचं. हल्ली हवं तेव्हा ऑनलाइन खरेदी करता येते. या काही वर्षात मी तर असंख्य कपड्यांची खरेदी केली असेल आणि केवळ फोटोमुळे कपडे लक्षात राहतात, पण प्रत्येक कपड्यावर फोटो काढला जाईलच हेही तसं शक्य नाहीच म्हणून असे असंख्य ड्रेस असतील, की मी वापरले, टाकून दिले आणि माझ्या ते जराही लक्षात नाहीत. परंतु दुकानात जाऊन विशिष्ट प्रसंगी कौतुकाने घेतलेले लहानपणाचे सगळे कपडे, फ्रॉक्स, पंजाबी ड्रेस सगळे अजूनही जसेच्या तसे रंग डिझाईन आणि कपड्याच्या पोतासहित लक्षात आहेत. खरं आणि वर्चुअल यातला हाच तर फरक आहे ना!
असो. तर आम्ही स्वेटर घेण्यासाठी दुकानात गेलो. लोकरीचे अनेक प्रकार, रंग पाहून शेवटी केशरी आणि अबोली याच्या मधला एक रंग आईने पसंत केला. तिने तो माझ्यासाठी पसंत केला असला, तरी मग संध्याला पण तोच हवा आणि राखी तर बाळच होती अगदी. बाही आणि स्वेटरच्या खालच्या काठावर पांढऱ्या रंगाचे डिझाईन आम्ही सिलेक्ट केलं. आईने तिच्यासाठी बदामी रंग निवडला. स्वेटरचे नमुने बघत असताना तिने आप्पासाहेबांसाठी एक बाह्या नसलेला म्हणजे शर्टच्या आतून घालता येईल असा स्वेटर निवडला. हे सगळं प्रकरण आत्ता फायनल झालं असलं, तरी प्रत्यक्ष स्वेटर्स हातात मिळायला दहा दिवस लागणार होते. हे दुकान आमचं नेहमीचच, त्यामुळे सगळे ओळखीचे…. हसत खेळत काउंटरला येऊन बिल करत असताना आप्पासाहेबांनी स्वतःच स्वेटर हळूच कॅन्सल केलं. आईने विचारलं असता ते म्हणाले, सध्या मुलांना गरज आहे आणि तू माझ्यासाठी निवडलेले स्वेटर तब्बल साडेतीनशे रुपयांचे आहे. सध्या मला नको. खरंतर अतिशय सधन आणि चांगली परिस्थिती असताना केवळ साडेतीनशे रुपयांसाठी त्यांनी ते स्वेटर का घेतलं नव्हतं हे एक कोडच होतं. अर्थातच 82… 83 साली साडेतीनशे रुपये ही मोठी रक्कम होती. आम्हाला फारसं काही कळत नसल्याने आम्ही आमच्या आनंदात होतो. आई मात्र तोंड बारीक करून दुकानाचे बाहेर पडली. आम्ही घरी आलो, आठ दहा दिवसात अतिशय सुबक, सुंदर, छान घट्ट विणलेले स्वेटर हातात आले देखील. आई मात्र त्या दिवसापासून बेचैन झाली होती. आप्पासाहेबांनी स्वतःसाठी स्वेटर घेतलं नाही हे तिच्या मनाला लागलं होतं.
आमचे एक स्नेही त्यांची बहीण त्याकाळी स्वेटर निटिंगचे क्लासेस घ्यायची आईने त्यांच्याकडे निटिंग मशीनवर स्वेटर विणण्याचा क्लास लावण्याचे ठरवले पुन्हा काही कारणाने ते रद्द झाले. मध्ये काही दिवस गेले आणि सकाळच्या जाहिरातीमध्ये एका निटिंग क्लासची जाहिरात तिने पाहिली. यावेळी मात्र हा क्लास करण्याचा तिने पक्का निश्चय केला. शनिपाराच्या अगदी बाजूच्या बिल्डिंग मध्ये तिसऱ्या मजल्यावर डाह्याभाई ते क्लास घेत. पर्वतीवरून चक्क बसने आई मला घेऊन त्या क्लासला जात असे. मी शाळेतून आले की मला काहीतरी खाऊ घालायचे, बाकी दोघींची खाण्यापिण्याची व्यवस्था करून त्यांना घरात ठेवून बाहेरून कुलूप लावून आम्ही दुपारी क्लासला जात असू. सुरुवातीचे काही दिवस माझ्या वडिलांना या क्लासची कल्पनाच तिने मुद्दाम दिली नव्हती. शिकण्यासाठी जो नमुना तिने निवडला होता, तो म्हणजे माझ्या वडिलांच्या मापाचा स्वेटर. अगदी तसाच, त्याच रंगाचा, त्याच डिझाईनचा, जो माझ्या वडिलांनी घेता घेता बाजूला ठेवून दिला होता. तो स्वेटर जेव्हा पूर्ण विणून झाला त्या दिवशीचे माझ्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव मी मरेपर्यंत विसरणार नाही. मी लहान असले तरी कळत्या वयाची होते. ज्या दिवशी स्वेटर पूर्ण झाला, माझी आई तो स्वेटर हातात घेऊन अक्षरशः नाचली होती. आप्पासाहेब घरी यायची वाट ती बघत होती. ते घरी आल्यावर जेवण वगैरे सगळं उरकेपर्यंत ती अगदी अस्वस्थ झाली होती. शेवटी सगळं आवरून होईपर्यंत आप्पासाहेब एकीकडे टीव्ही लावून त्या दिवशीच्या अनेक वर्तमानपत्रांची चळत चाळत बसले असता हळूच एका पिशवीतून स्वेटर काढून त्यांच्यासमोर ठेवला. त्यांनी तो स्वेटर पाहिला आणि म्हणाले, अरे मी नको म्हणालो होतो ना, मग कशाला? कुठून सुरू करू आणि कसं सांगू अशा गडबडीत, आनंदात आई सांगत होती, अहो हे मी विणलय… तुमच्यासाठी. त्यापुढे मग रोज क्लासला जाण्याची ती रामकथा, तो क्लास याबद्दलची सगळी सविस्तर माहिती सांगून झाली. हे सगळं सांगताना आईला खूप भारी वाटत असावं. कारण खूप सार्या गोष्टी तिला शब्दात व्यक्तच करता येत नव्हत्या. खरंतर तिने त्यांच्यासाठी स्वेटर विणला आणि त्यांना छानसं सरप्राईज दिलं यात दोघेही किती छान आनंदी असायला हवे होते, पण का कुणास ठाऊक एकाच वेळी स्वेटरची घडी दोघेही हातात धरून एकमेकांकडे बघून हसता हसता रडत होते. यानंतर यथावकाश अगदी आधुनिक दोन तीन स्वेटर निटिंग मशीन्स घरी आली. मग आम्हा सगळ्यांना विविध रंगाचे अनेक डिझाईनचे अनेक स्वेटर्स वापरायला मिळाले. माझ्या वडिलांसाठी तर तिने खास हौसेने अनेक डिझाईनचे स्वेटर बनवले होते. पुढे जाऊन आईने याचा एक छोटा व्यवसाय करून आम्हा सगळ्यांना या मशीनवर स्वेटर विणायला शिकवले. कित्येक वर्ष आम्ही हा छोटासा व्यवसाय करीत होतो. अगदी माझं लग्न झाल्यावर माझा मुलगा मोठा होऊन हायस्कूल मध्ये जाईपर्यंत आईने तयार केलेले स्वेटर वापरत होता.
पुढे दहावी झाल्यावर सुट्टीत मी सदाशिव पेठेत आपटे सरांकडे चित्रकलेच्या क्लासला जात असे. सुरुवातीचे काही दिवस जनरल क्लास करता करता जेव्हा पेन्सिल पोट्रेट शिकायला सुरुवात केली, तेव्हा मी आईला विचारलं, मी पहिला फोटो कुणाचा काढू त्यावेळी आई म्हणाली, थांब. मी देईन त्या फोटोने सुरु करशील. माझ्या वडिलांना विचारून तिने एका फोटो फ्रेम मधून माझ्या आजोबांचा फोटो काढून दिला. आमच्या जन्माच्या खूपच आधी ते स्वर्गवासी झाल्याने आम्ही त्यांना पाहिलंच नव्हतं. फोटो देखील ब्लॅक अँड व्हाईट आणि अत्यंत जुना असला तरी त्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तो फोटो त्यांच्या जिवंतपणीचा नव्हता. ते गेल्यावर गळ्यात हार घातलेला आणि फोटो काढण्यापुरते बसवून काढलेला तो फोटो होता. डोक्याला फेटा गळ्यात हार आणि अंगामध्ये स्वेटर असावा. फ्रेम मधून फोटो बाहेर काढल्यावर आप्पासाहेब मला म्हणाले, दिपू हा फोटो नीट हाताळ. एवढा एकच फोटो माझ्या वडिलांचा माझ्याकडे आहे. फोटो वरून हात फिरवताना त्यांचा आवाज कातर झाला. म्हणाले, गरीबी खूप वाईट असते ना… माझ्या वडिलांना आजारपणात स्वेटर मिळाला नाही, ते गेल्यानंतर ती इच्छा अपुरी राहू नये म्हणून कुठून तरी रस्त्यावर स्वेटर विकणाऱ्या नेपाळी माणसाकडून हा स्वेटर विकत आणून शेवटचा त्यांना घातला होता. म्हणूनच स्वेटर म्हटलं की मला बेचैन होतं. परिस्थिती इतकी वाईट होती, की माझ्या वडिलांना ते जिवंत असताना आणि आजारी असताना मला साधा एक स्वेटर देखील घेता आला नाही. आजही मला त्याची खूप खंत वाटते. मला एकदम तो लहानपणीचा स्वेटर खरेदीचा प्रसंग आठवला आणि मग लक्षात आलं की माझ्या वडिलांनी तो महागडा स्वेटर का घेतला नव्हता. मी त्यादिवशी खूप खूप रडले. अर्थातच पहिलं पेन्सिल पोट्रेट मी माझ्या आजोबांचं काढलं होतं. चित्र काढत असताना स्वेटरची विण रेखाटताना मी अनेक वेळा रडले.
पुढे आयुष्य सरकत राहिलं. आयुष्यभरात अनेक आणि अनेक प्रकारची स्वेटर्स घेतली असतील, तरीही प्रत्येक वेळी स्वेटर घेताना मला आप्पासाहेबांचा चेहरा आठवतो. नंतर आप्पासाहेब आजारी असताना अनेक दिवस एक चॉकलेटी रंगाचं आईनेच विणलेलं स्वेटर वापरत होते. ते गेल्यावर त्यांचे सगळे भारी कपडे कुणाला तरी वापरता येतील म्हणून देत असताना आईने त्यांचा एक शर्ट काढून घेतला आणि दोन भरलेल्या व्यापारी पिशव्या माझ्या हातात दिल्या. कुणा गरजूला दे. इतकंच म्हणाली. माझ्या ओळखीच्या एका ठिकाणी ते कपडे देत असताना पिशवीच्या तळाशी असलेलं ते स्वेटर मी बाहेर काढलं. ते सगळे कपडे देताना त्या कपड्यांवरून हात फिरवत मी खूप रडत होते. घेणाऱ्या माणसाला ते विचित्र वाटू नये म्हणून स्वतःला आवरलं. पिशव्या रिकाम्या करून घड्या घालून ताब्यात घेतल्या, निघाले आणि परत मागे येऊन ते स्वेटर उचलून म्हणाले, हे इतकं मी ठेवते. ते स्वेटर घेऊन घरी आले. माझ्याकडे आजही ते स्वेटर मी जपून ठेवलंय. जेव्हा अगदी टोकाचा एकटेपणा वाटतो, अस्वस्थ होते, तेव्हा ते अंगात घालते आणि मग थेट आप्पासाहेबांच्या कुशीत शिरल्याचा अनुभव घेते…..
पुढच्या आठवड्यात ट्रेनिंग साठी व्हिएतनामला जायचंय सकाळी मोबाईलवर तिथल्या हवामानाचा अंदाज घेतला आणि आत्ता बॅग भरताना स्वेटर ठेवता ठेवता आठवणींची एवढी मोठी उजळणी करून झाली. वय वाढत चाललंय तसं तसं मागच्या आठवणी ठळक होत चालल्यात….सगळ्यांचं असंच होतं का?
– दीपा
Leave a Reply