Press ESC to close

Deepaa BhagwatDeepaa Bhagwat Crafting Stories, Sharing Memories

रिकामी जागा ..

डिसेंबर जानेवारी जवळ आला की, गॅदरिंगचे वेध लागायला सुरवात होते. दहावीच्या अभ्यासाला आणि परीक्षेच्या तयारीला दोन महिने वेळ देण्यासाठी, गॅदरिंग पाठोपाठ मोठा कार्यक्रम असतो तो म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अर्थात सेंड-ऑफ! या निमित्ताने बऱ्याच मोठा कार्यक्रम आमच्या शाळेत असायचा… माझी एक ठळक आठवण आहे या दिवसांमधली. मी दहावीला असतानाही सेंड-ऑफ च्या दिवशी असेच काही विशेष कार्यक्रम ठेवलेले होते. त्यामध्ये एक होता मिस नु.म.वि. स्पर्धा. वर्गातल्या बहुतेक मुलींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. मी तर त्याकाळात शाळेतल्या अतिसामान्य पेक्षाही अतिसामान्य होते. (आजही तशीच आहे) विशेष म्हणजे तरी देखील मी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्याकाळी अभ्यासात अंधार असला तर इतर कोणत्याही आणि कितीही गोष्टीत तुम्ही निपून असलात, तरी तो उजेड तुमच्या काहीच कामाचा नसे. त्याकाळी अभ्यासात हुशार मुलीच शाळेत ओळखल्या जायच्या. त्यामुळे मला अर्थातच कुणीही ओळखत नव्हतं. हं. तर त्या स्पर्धेत मी भाग घेतला असल्या कारणामुळे ओघाने तयारी करणं आलंच.. 
टिळक रोडला महाराष्ट्र मंडळासमोर ला-बेला नावाचं रेडीमेड ब्लाऊजचं दुकान होतं. 1987 ची ही गोष्ट आहे, त्याकाळी अतिशय फॅशनेबल आणि अनेक तऱ्हेचे रेडिमेड ब्लाउज तिथे मिळत होते. आहे की नाही पुणं दुनियेत भारी? तर तिथून एक छान पैकी स्लिव्हलेस ब्लाऊज मी आणलं होतं. आईची एक सुंदर पांढरी साडी नेसून मी त्या स्पर्धेसाठी तयार झाले होते. स्पर्धेचं स्वरूप असं होतं की, परीक्षक पाच प्रश्न विचारणार होते आणि कोणत्यातरी एका विषयावर बोलायला सांगणार होते. मला विचारलेले पाच प्रश्न आता अजिबातच आठवत नाहीत. परंतु एकूण माझा स्टेज फियर आणि भांबावलेपणा पाहून दोन मिनिटांसाठी मला बोलण्यासाठी विषय दिला गेला “माझी आई”..
म्हटलं तर विषय एकदम सोपा आणि म्हटलं तर यापेक्षा अवघड विषयच नाही…. मी म्हटलं, माझी आई? आणि पुढच्या एका क्षणात मी एकदम ब्लँक झाले. एकही अक्षर सुचेना, फुटेना, आठवेना…. 
स्टेजवरून खाली उतरले आणि पळत पळत थेट वर्गात निघून गेले. एका बाकावर जाऊन बसले तेव्हा लक्षात आलं, रडू येत होतं, खूप धडधडत होतं… हात थरथर कापत होते… ही धडधड त्या गर्दीसमोर बोलण्याची होती, की इतक्या साध्या विषयावर देखील आपल्याला काहीच कसं बोलता आलं नाही? या बावळटपणाची होती, की इतका मोठा विषय मी दोन मिनिटांत कशी बोलणार होते? या अशक्य पणाची होती हे आजवर मला उमगलेलं नाही. अर्थातच तेव्हाही शाळेतल्या कुणालाही त्याचं काहीही पडलेलं नव्हतं. मी एक मठ्ठ विद्यार्थिनी होते. त्यामुळे चेष्टा-मस्करी आणि माझी खिल्ली उडवण्या व्यतिरिक्त फार काही त्यातून निष्पन्न झालं नव्हतं. या गोष्टीला जवळपास 36..37 वर्ष होत आली तरीही अनेकदा ती मला एकांतात फार वेळा आठवते. 
कारण त्याकाळच्या माझ्या इतर मैत्रिणींच्या आयांसारखी माझी आई टिपिकल नव्हती. हल्लीच्या काळातल्या आयांसारखी किंवा त्या काळच्या जाहिरातीतल्या आईसारखी तर ती अजिबातच नव्हती. 
खरोखरच, आम्ही शाळेतून आल्यावर हातातून दप्तर, वॉटर बॅग घेऊन आम्हाला गरमागरम ताट वाढणारी आमची आई नव्हती. माझ्या वडिलांच्या कारखान्यासाठी सहा ते सात कामगारांसह एक सपोर्टीव्ह वर्कशॉप ती चालवायची. प्लास्टिक मोल्डिंगची चार मशिन्स आणि इतरही बरेच मशीन्स होते. माझी आई त्या काळी लेथ मशीनही चालवायची. तिला सगळेच घाबरायचे. आम्ही बहिणी तर जाम टरकून असायचो.
घर कामासाठी मोलकरणी असताना आमचे कपडे कायम आम्हालाच धुवावे लागले. स्वयंपाक करण्यायोग्य झाल्यानंतर (वयाच्या बाराव्या वर्षांपासून) कधीही आयतं जेवायला मिळालं नाही. छान आवरलेल्या सोप्यावर हात पाय लांब करून लोळणं हा त्याकाळी गाढवपणा होता. तासा-दीड तासापेक्षा जास्त टीव्ही बघायला मिळणे म्हणजे पर्वणी होती. फोन खणखणत असताना पळत जाऊन फोन घेण्याची परवानगी नव्हती. आईच्या वस्तूंना किंवा घरातील इतर कोणत्याही ही महत्वाच्या वस्तूंना हात लावण्यापूर्वी आणि वापरण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागत असे. इतकंच काय तर आईच कपाट उघडण्यापूर्वी देखील तिला विचारावं लागे… अगदी आज पर्यंत…
इथं जर अशा सुसाट सुटल्या सासरी जाऊन काय कराल? आई-बापाच्या नावाचा उद्धार करून घ्यायचाय का? हे सतत ऐकायला मिळायचं. वडिलांनी दिलेले घर खर्चाचे पैसे तिने कधीही खर्च केले नाहीत तर, स्वतः काम करून त्या पैशाने घरातला खर्च भागवला जायचा. या वर्कशॉप व्यतिरिक्त घरात दोन स्वेटर निटिंग मशीन होते. आम्हाला भरतकाम, विणकाम, शिवणकाम, स्वयंपाक, इत्यादीचे भरपूर क्लासेस करणं बंधनकारकच होतं म्हणा ना… 
संध्याकाळी दिवेलागण होताना देवापुढे दिवा, उदबत्ती लावून शुभंकरोती, रामरक्षा म्हटल्याशिवाय संध्याकाळ सरत नव्हती. दुपारी शाळेत जसं ‘वदनी कवल घेता’ म्हणणं सर्रास होतं, तसंच घरात देखील ते म्हटल्याशिवाय जेवणं हा अन्नाचा अपमान होता. दूध, दही खरकट्यात टाकलं, मीठ सांडवलं तर देव शिक्षा करतो हे त्रिकालाबाधित सत्य होतं आणि त्याची चिकित्सा करायची नाही हा नियम होता. 
रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त त्याकाळी फेमस झालेल्या सगळ्या ऐतिहासिक कादंबऱ्या हाणून मारून तिने वाचायला लावल्या होत्या. पुढे आपोआपच वाचनाची आवड निर्माण झाली. उद्योगी राहण्याची सवय लागली. स्वावलंबी असणं स्वाभिमानाचं वाटू लागलं. कुठलीही गोष्ट बघताक्षणी जशीच्या तशी करून बघता आली नाही तर कमीपणाचं वाटू लागलं. सेल्फ लर्निंग रक्तात भिनवलं गेलं. आई म्हणायची, बाईने असं असावं की कितीही उंचावरून फेकलं तरी मांजरा सारखं चारी पायांवर अलगद उभं राहता आलं पाहिजे. आयुष्यात कुठल्याही प्रसंगात ठाम आणि खंबीरपणा म्हणजे काय हे समजायच्या आतच उमजायला लागलं होतं. वाजवीपेक्षा अधिक काळजी करणारी माणसं पारखूनच घ्यायला हवीत हेही तिने सांगितलं.  खरंतर कित्येक गोष्टी तिने स्वतःच्या आचरणातून  शिकवल्या होत्या. त्यासाठी वेगळे कष्ट घेण्याची तिला कधी गरजही पडली नाही.
शेवटच्या क्षणापर्यंत डोळ्यासमोर असणारी माझी आई दवाखान्यात जाताजाता सुद्धा चार गोष्टी मला सांगून गेली… गाडीतून हॉस्पिटलला जाताना खूप दम लागत असताना “सर्व मंगल मांगल्ये” तुटक तुटक म्हणत होती. ती अडखळत होती म्हणून तिच्यासोबत मीही अगदी वार्डात शिफ्ट होईपर्यंत मोठमोठ्याने देवीचा जप करत होते…..
आता तिला जाऊनही तीन वर्ष होत आली. काळ पुढे सरकतोय आईच्या जागेवर आपण आणि आपल्या जागेवर आता आपली मुलं आली आहेत. त्या सगळ्या गोष्टी हल्ली अनुभवतेय ज्या मी मुलगी असताना माझी आई अनुभवत होती. मुलं कर्ती झाल्यावर त्यांना गोंजारताना आई कौतुकाने भावनाविवश का व्हायची, अति काळजीने सतत सूचना, फोन का करायची, जरासा चेहरा कोमेजला की अस्वस्थ का व्हायची, हे तिच्या जागेवर आल्यावरच समजलं… माझ्या जागेवर माझी मुलं आली, पण तिची जागा मात्र कुणीच भरून काढू शकणार नाही…. ती रिकामीच राहील मी असेपर्यंत!  खरं तर तिच्याबद्दल लिहू लागले, तर वेळ आणि इथली जागा दोन्ही पुरायचा नाही. म्हणूनच ती सतत येतच राहील माझ्या लिखाणात वेगवेगळ्या आठवणींमधून !


– दीपा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Instagram
[instagram-feed feed=1]