
तो सुट्टीचा दिवस असूनही सबंध दिवस कामातच गेला. त्यावेळी आशिष आठवड्यातून एकदाच घरी यायचा, मग आमचं तिघांनी मिळून जेवायला बाहेर जाणं ठरलेलंच असायचं. आजही तसंच होतं. फॅमिली गार्डन मध्ये प्रवेश करताच, एका कोपऱ्यात खुर्चीवर एक छोटा मुलगा एकटाच बसलेला होता. त्याच्याच बाजूला एक टेबल आणि त्यावर एका ट्रेमध्ये काहीतरी ठेवलेलं होतं. तो मुलगा इतका छोटा होता की, टेबल टॉप त्याच्या छातीला लागत होता. एखाद्या शहाण्या मुलासारखा तो शांत बसलेला होता. त्याची माझी नजरानजर होताच एक छान स्माईल त्याने दिलं. आम्ही आमच्या टेबल जवळ जाऊन बसलो. एकेक पदार्थ येत होता आणि चवीने आम्ही त्याचा आस्वाद घेत गप्पा मारत होतो. का कुणास ठाऊक पण पुन्हा-पुन्हा माझं लक्ष त्या मुलाकडे जात होतं. एक दहा-पंधरा मिनिटांत लक्षात आलं की, तो एक मेंदी काढणारा मुलगा होता. हॉटेलमध्ये येणाऱ्यांपैकी काही बायका, मुली, काही लहान मुली त्याच्याकडून मेंदी काढून घेऊन मिरवत होत्या. हल्ली फॅमिली गार्डन मध्ये लहान मुलांसाठी खेळणी, सेल्फी स्पॉटस् तसेच असा एखादा मेहंदी काढणारा मुलगा असतोच. असं एक फॅडच आलंय हल्ली इथे… तो मेंदी काढतोय हे समजल्यावर त्याच्याबद्दलची उत्सुकता मला काही एका जागेवर शांत बसू देईना. एकतर त्याच्यासोबत कोणी मोठं नव्हतं, त्याच्याच वयाची इतर मुलं धुडगूस मस्ती घालत असतांना हा मात्र टेबलावर ठेवलेल्या ट्रेमधून मेंदीचे कोन घेऊन समोरच्या खुर्चीत बसणाऱ्या प्रत्येकीच्या हातावर तल्लीन होऊन अगदी सहज सहज मेंदी काढत होता. शेवटी न राहवून मी उठले आणि त्याच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसले. तो माझ्याकडे बघून गोडसं हसला. मी हात पुढे केला आणि म्हणाले, छान छोटेसं डिझाईन माझ्या हातावर काढून दे. माझ्याकडे पाहत म्हणाला, हिंदी मे बोलिये ना… मराठी नही आती हैं. त्याच्या मांडीवरच्या उशीवर पालथा हात ठेवून म्हणाले, बस एक छोटासा डिझाईन… हातातला मेंदीचा कोन ॲडजस्ट करून तो सराईतपणे पानाफुलांची नक्षी माझ्या हातावर काढू लागला.
मी म्हणाले, कहा रहतें हो? तो म्हणाला, “यहासे नजदीक ही रहता हूँ.”
“स्कूल जाते हो?” माझा पुढचा प्रश्न.
“हां दिदी जाता हूँ” कामावरची नजर जराही न हटवता त्याने सांगीतलं.
“घर में कौन कौन है?”
“कोई नही दिदी. घर के लोग गांव मे रहते है. एक बडे भाई के साथ काम करता हूँ.”
“कौनसी कक्षा मे पढतें हो?”
“मै पांचवी मे हूँ”
“स्कूल से आने के बाद में करता हूँ और फिर रोज शाम से रात के ग्यारह बजे तक यहाँ”
“तो क्या दिन भर काम करते हो”?
“तुम इतने छोटे हो, मम्मी ने बाहर गांव कैसे भेज दिया?”
“मेरी बहन बहुत छोटी है ना, तो माँ काम नही कर सकती. तो घर की ज़िम्मेदारी भी तो हैं”
किंचीत एक भुवयी उंचावत डोळे मोठे करत म्हणाला, “मैं घर में सबसे बडा हूँ. पहले पप्पा अकेलेही काम करते थे, फिर पडोस के लडके ने मुझे मेहंदी कोन चलाना सिखा दिया. वो मेरे भाई जैसा ही हैं, उसी के साथ यहा काम करने आया हुँ. उसी के साथ रहता हुँ”.
एवढ्या चौकशा आणि प्रश्न उत्तरात त्याची मेंदी काढूनही झाली होती. त्याच्या हातात बक्षीस म्हणून शंभर रुपयांची नोट ठेवली आणि मी देखील मेंदी भरला हात मिरवत माझ्या टेबल जवळ येऊन बसले. भूषण म्हंटले, घरातलं लग्नकार्य सोडता, कधी सणासुदीला सुद्धा मेंदी काढत नाहीस. हे आज काय नवीन? मी म्हटलं, केव्हांची मी त्या मुलाला मेंदी काढताना बघतेय. त्याला बक्षीस द्यावंसं वाटलं पण काम न करता त्याने माझ्याकडून पैसे घेतले नसते. आणि तो काम करतोय म्हटल्यावर, तसेच पैसे देऊन त्याचा स्वाभिमान का दुखवायचा?
आम्ही निघतोय असं लक्षात आल्यावर आमच्या टेबल जवळ येऊन माझ्या हातात कार्ड देत म्हणाला, “थँक्यू दीदी. मैं घर आकर दुल्हन के हात पर भी मेहंदी निकालता हूँ. ज्यादा नहीं, बस पाचसों रूपये में… ये मेरा कार्ड हैं, भाई का मोबाईल नंबर हैं इसपें.” त्याचा निरोप घेऊन आम्ही निघालो आणि रस्त्यात एकच विचार सतत येत होता, पाचवीचा मुलगा म्हणजे जेमतेम दहा ते अकरा वर्षाचा असणार. गाव सोडून तो दुसऱ्या गावात आलाय. तेही पैसे कमवण्यासाठी. ज्या वयात आई वडील मुलांच्या हातात खर्च करायला पैसे देताना विचार करतात, त्या वयात हा मुलगा पैसे कमवत आहे. धाकटी बहीण घरात असल्याने आई काम करू शकत नाही याहीपेक्षा, “मैं घर में सबसें बडा हूँ” हे सांगताना त्याच्या डोळ्यांत पाहीलेली चमक मी कधीच विसरणार नाही. तो आत्मविश्वास, स्वाभिमान, जबाबदारीची जाणीव इतक्या छोट्याशा जीवात कशी काय होती, कोणास ठाऊक?
परिस्थिती माणसाला वयापेक्षा मोठं करते, हेच खरं. घरी पोहोचले आणि मनात आलं, अरे देवा… त्याच्यासोबत एखादा फोटो काढायला हवा होता. काय सांगावं, पुढे जाऊन एखादा मोठा आर्टिस्ट होईल, त्यावेळी मला म्हणता आलं असतं, मी पण या कलाकाराकडून कधी मेंदी काढून घेतली होती…. त्या छोट्याश्या उद्योजकाच्या रोपट्याला पाहून त्याच्या भरारीचा नक्कीच अंदाज आलाय. आयुष्यात भेटलेल्या काही व्यक्तींना मी कधीच विसरू शकणार नाही त्यात आज या एकाची अजून भर पडली….
– दीपा
Comments (1)
Aashish Bhagwatsays:
August 11, 2024 at 1:00 pmNice post