आजच्या सारखी उदासीन नसायची तेव्हा सायंकाळ….. १५ दिवस आधीपासूनच तयारी सुरु व्हायची. फेर, फुगड्यांच्या आवाजानं उशीरपर्यंत अंगण गजबजलेलं असायचं. भराभरा जेवणं आणि नंतरचा कामाचा पसारा उरकत प्रत्येकजण अंगणात यायला उत्सुक असायची. दिवेलागण होतानाच गाणी आपोआप ओठांवर रेंगाळायची. अजिजीनं पावसाला सांगायचो जरा २…. ४ तास थांब बाबा. दारापुढचं अंगण जरा सुकू दे. धिंगाणा घालायला चिखल अजिबात नको. तो ही बऱ्याचदा ऐकायचा. आम्हां मुलींमध्ये काही हौशी मावश्या असायच्या. त्या फेराची गाणी म्हणायच्या आणि आम्ही त्यांच्या मागून आळवायचो. भारी मजा यायची. फुगडी घालतांना चक्कर येईतो थांबायचो नाही. रोजचा हा वेळ मज्जा असायची. मग पंचमी जवळ आली की, नेलपेंट आणून ठेव, कुठे मेंदी गाळून ठेव असे उद्योग सुरु व्हायचे. आई नवा ड्रेस घ्यायची हमखास…. म्हणे मुलींचा सण !! नव्या बांगड्या, कितीतरी पैंजणं मला आईने पंचमीलाच घेऊन दिली होती. पंचमीची आदली रात्र फेर-फुगड्यांचा धिंगाणा नसायचा पण मेंदी लावायची लगबग मात्र घराघरात असायची. घरातली जख्ख आजी सुद्धा मेंदीचं बोट हातावर लावून घ्यायला चुकायची नाही. सकाळपासूनच तयारी मेंदी भिजवायची. आम्ही तर काय काय केलं नसेल मेंदी रंगवायला…. भेंडीचं पाणी घाल, चिमणीची शी शोध, लवंग काय, चुना काय, अमृतांजन आणि विक्स सुद्धा सुटायचं नाही. तरीही ती मेली केशरी रंगाच्या पलीकडे कधी रंगलीच नाही. पंचमी उजाडायचीच स्वतःचे रंगलेले हात बघत….
नाचत नाचतच संध्याकाळ व्हायची. उंचीला दुप्पट होत असली तरी आईची साडी नेसायची, दागिने घालायचे, नव्या बांगड्या आणि मेंदी रंगलेली पावलं पळत सुटायची अंगणात खेळ खेळायला. इतक्या दिवसांची तालीम असायची रोजची आणि आजचा दिवस तर खास….. रात्रीचे १२ वाजत आले तरी खेळ संपायचा नाही.
आज दुपारी कळलं की आज पंचमी आहे. कॅलेंडर पाहिलं आणि उगीचच अपराध्यासारखं वाटलं….. नकळत कोरे तळहात पहिले आणि अस्वस्थच झालं. आजची पंचमी कॅलेंडरच्या चौकटीत होती फक्त….. !!
— दीपा
Leave a Reply