एखाद्या हळव्या क्षणी आपण कधी आठवणींच्या बोगद्यापाशी येऊन पोहचतो, ते कळत देखील नाही…. आणि मग हवं असो, किंवा नसो अंधारामध्ये लख्ख चमचमणाऱ्या आठवणी मागे टाकत टाकत आपण पुढेच जात राहतो. एक आठवण हात धरून दुसऱ्या आठवणीपाशी घेऊन जाते, आणि आपण त्यांना सोबत घेऊन रमत-गमत चालतच राहतो.
एखादा वर्षानुवर्षे जपलेला फोटोचा अल्बम चाळत असतांना एकेक फोटो जसा सजीव होत जातो ना, आठवणी चाळताना अगदी तसंच होतं विचारांचं देखील. प्रसंग जसे आठवत जातात, तशी त्यातल्या महत्वाच्या व्यक्ती आणि संदर्भ वाढतच जातात आणि आठवणींचा परीघ अजून मोठा होत जातो.
किंवा एखाद्या झाडाखाली पडलेल्या फुलांतून सुगंधी फुलं वेचावीत तितक्या आवडीने, तसे तन्मयतेने आपण वेचत जातो जगलेला एकेक क्षण, त्यातले बारकावे…. हे सगळं आठवतांना हळूच कधी खुदकन् हसू उमलतं, तर कधी एखाद्या काट्याचा सल अस्वस्थ करून टाकतो.
अगदी साध्या चहा कॉफीच्याच बाबतीत बघा ना दैनंदिन जगण्यातली अगदी सामान्य गोष्ट आहे पण तरीही काही आठवणी कशा घट्ट चिकटलेल्या असतात. निवांतपणातला एखादा चहाचा कप कधी कधी किती दूरवर घेऊन जातो विचारांच्या गावात… पाऊस पडत असतांना सोबत घेतलेला वेलची-आल्याचा चहा तर चक्क एखाद्या मिठीचीच आठवण मागे ठेवून जातो. कधी प्रेमात रात्री-बेरात्री बिनसाखरेच्या चहाने त्या प्रसंगाचा गोडवा धरून ठेवलेला असतो, तर कधी थंड बरिस्ता मधल्या ब्रेकअपच्या महागड्या कॉफीची कडवट चव विसरता विसरली जात नाही.
एखादं गाणं गुणगुणत आठवणींशी चाळा करत राहणं हा तर मनाचा आवडता छंद असतो. एकच गाणं आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण ऐकत असलो तरी दरवेळी वेगळा अर्थ उमजत जातो, एकाच गाण्याभोवती किती गर्दी होते आठवणींची. कुणाकुणासोबत, किंवा अनेक सहलींमध्ये, कधी एकट्याने केलेल्या प्रवासात तर कधी खिडकीतून रात्रीचं आकाश नुसतं न्याहळत ऐकलेल्या गाण्याने किती सोबत केलेली असते… अगदी जुन्याच आठवणी कशाला तर हल्ली हल्लीच शेअर केलेली प्ले-लिस्ट ऐकतांना ताज्या आठवणी अजून हिरव्यागार होतातच की!
या गाण्यांसारखी काही काही ठिकाणं देखील अशीच आठवणींनी गजबजलेली असतात. शाळा, कॉलेज ही त्यापैकी प्राथमिक उदाहरणं म्हणता येतील. पण तशी ती कोणतीही असू शकतात. कुणासोबत प्रवास केलेला एखाद्या गावचा रस्ता, तळ्यातला गणपती, लक्ष्मीरोड, तुळशीबाग, पर्वती अगदी काहीही असू शकतं.
आठवणी म्हणजे काय असतं नेमकं? ठरवून विसरायचं ठरवलं तरी विसरता येत नाहीत त्या म्हणजे आठवणी. त्या जगण्यातल्या प्रवासातले मैलाचे दगड असतात, नंतर केव्हातरी आयुष्याचा आढावा घेता यावा यासाठी जमवलेले क्षण असतात. म्हणूनच हळवेपणात मन भूतकाळात रेंगाळायला लागतं आणि आठवणींच्या गावातून लांबलचक चक्कर मारून येतो आपण…. आठवणींच्या या बोगद्यातून बाहेर पडून नव्या आठवणी जन्माला घालण्यासाठी पुन्हा एकदा जोमाने जगायला लागतो… हो की नाही? तुम्हाला काय वाटतं?
– दीपा
Leave a Reply